हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ

 

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ

लेखक: भालचंद्र नेमाडे
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन

ही कादंबरी मी अभियांत्रिकीला असताना प्रकाशित झाली होती. तेव्हा दुनियादारी करताना वाचन खूप मागे पडले होते. त्यामुळे कधी वाचताच आली नाही.
नंतर चांगदेव चतुष्टक आणि कोसला वाचून झाले. त्यामुळे नेमाडेंच्या लिखाणाच्या शैलीचा अंदाज आला होता. मागील पुस्तकां प्रमाणेच यात देखील काहीतरी नवीन प्रकार 'वगैरे' पहायला मिळणार याची उत्सुकता होतीच. माझ्या वाचनात काही पुस्तके आली आहेत जी मी वाचायला घेतली खरी पण ती पूर्ण होण्यासाठी नेहमी पेक्षा जास्त वेळ लागला आणि मध्येच नवीन पुस्तक वाचायला घेतले गेले. या पुस्तकाच्या बाबतीत पण काहीसे सारखंच झालं. 

पुस्तक हे नेमाडे शैलीतच आहे. पुस्तकाचा नायक खंडेराव मोरगाव (खानदेश) चा राहणारा, याच्या नजरेतून मुख्यत्वे ग्रामीण संस्कृती आणि समांतर पिढ्यानपिढ्या चालणारी हिंदू संस्कृतीचे वास्तववादी दर्शन लेखकाने घडवले आहे. खंडेराव हा साचेबद्ध जीवनाच्या चौकटीतून बाहेर पडू पाहणारा नायक, घरची परिस्थिती चांगली असल्याने शिक्षणाच्या कक्षा रुंदावत वेगळा मार्ग निवडतो ज्यात त्याला पुरातत्व विभागात पीएचडी ची संधी मिळते.

खंडेराव च्या चिकित्सक नजरेतून पुस्तकाचा प्रवास चालू होतो, त्याच्या जीवनातली व्यक्तींचे वैशिष्टे, जीवनातील विविध प्रसंग, मोहंजडो ते मोरगाव असा प्रवास या प्रवासातील काही टप्पे जसे पुणे, औरंगाबाद हे सर्व प्रसंग सांगताना (आठवताना) त्यांची सांगड ग्रामीण कुटुंव्यवस्था आणि त्याच्या मुळाशी असलेली हिंदू संस्कृती यावर खंडेराव कधीकधी सडेतोड आणि कधीकधी खोचक टिप्पणी करतो. 

विशेष म्हणजे सुरवातीला विविध अंगांनी शेतीप्रधान असेलेली हिंदू संस्कृती नाकारणारा खंडेराव कधीकधी प्रांजळपणे संस्कृतीचे काही फायदे अधोरेखित करतो ते वाचकाला काही गोष्टींवर विचार करायला लावतात. खंडेराव ला पडलेले प्रश्न आपल्याला देखील केव्हातरी पडले असतील किंवा पडतील असे वाटते. पुष्कळ पात्र ही लक्षात राहतात जसे की भावडू, दुसऱ्या देशातून मोरगाव मध्ये रिसर्चसाठी राहायला आलेली मंडी, पेंढाऱ्याने केलेलं आक्रमण, खंडेराव च्या आत्याला झालेला सासुरवास आणि तिने घेतलेले धाडसी निर्णय. पुस्तक वैचारिक आणि रंजक देखील आहे. त्यामुळे वाचकांनी वाचावेच असे. (पण सर्वासाठी नाही)

पुस्तक नेहमीच्या पठडीतील नाही त्यामुळे सर्वांच्या पचनी पडेल असेही नाही. पुष्कळ प्रसंग मोरगावातील असल्याने थोडी अहिरणी भाषेची छाप देखील आहे आणि काही ठिकाणी ग्रामीण ढंगातील सडेतोड शब्दरचना आहे, त्यामुळे काही लोभस असे वाचायला मिळेल अशी अपेक्षा ठेवून पुस्तक वाचायला घेऊ नका. आणि मागील पुस्तकांप्रमाणे काही प्रसंग हे पूर्णपणे खंडेरावच्या डोक्यात चालू आहे. जर आपणास नेमाडेंच्या लिखाणाच्या शैलीची सवय नसेल तर आपणास पुस्तक निश्चित आवडणार नाही. 

Comments

Popular Posts