रतनगड

 रतनगड 

रतनगड


रतनगड
ठिकाण : कळसुबाई डोंगररांग (भंडारदरा जवळ)
काठिण्य पातळी : मध्यम

चमू :

अनिकेत हिरवे
अर्पित बेंडले
अभिनव हिरवे
कौस्तुभ वाडे
दीपक दहातोंडे
निखिल राठोड
निल पानसरे
श्रीकांत

यंदा मनासारखा मान्सून ट्रेक काही झाला नाही. (मान्सून पण मनासारखा झाला नाही हे पण तितकेच खरे) तरी मध्यंतरी घनगड, डोंगरवाडी असे काही ट्रेक केलेच त्यातील फक्त डोंगरवाडी चा ट्रेक पूर्ण पावसात केला. गणपती झाल्यानंतर सालाबादप्रमाणे मान्सून नंतरचे ट्रेक करावे असा बेत चालू होता. पण मान्सून सारखा पाऊस गणपती आणि अगदी आत्तापर्यंत पडतोय.

हरिशचंद्रगड, राजगड - तोरणाची दमवणारी वाट आता खुणावू लागली होती. राजगड - तोरणासाठी तर अगदी पोषक वातावरण होते. म्हणून आठवड्याच्या सुरवातीलाच अर्पित ला फोन केला त्याने राजगड तोरणासाठी तयारी नाही म्हणून जमणार नाही सांगितले पण हरिश्चंद्रगड किंवा रतनगड करू असे सुचवले. त्यात त्याने रतनगडाचे काही फोटो पाठवले त्यात यंदा रतनगड कारवीच्या फुलांनी बहरलेला दिसत होता. मग बाकी सर्व बाजूला सारून रतनगडाचा बेत नक्की केला आणि इच्छुकांचा शोध चालू केला. निल आणि दीपक ने लगेच हो म्हणून सांगितले हळूहळू अभि, कौस्तुभ पण तयार झाले ; शेवटच्या क्षणी श्रीकांत आणि निखिल पण आले. मग अर्पित आणि श्रीकांत ची गाडी घेऊन शुक्रवारी रात्री पुण्यातून आम्ही निघायचे ठरले. 
 
तसे कळसुबाई डोंगररांग हि विविध अनवट वाटा, किल्ले आणि दरी ने समृद्ध आहे.  ज्यात हरिश्चंद्रगड, कळसुबाई, सांधन दरी, खुट्टा, कात्राबाई, अलंग-मदन-कुलंग इत्यादी अवघड पण तितकीच सुंदर ठिकाण येतात. फक्त पुण्यातून इकडे येताना एकच अडचण आहे ती म्हणजे अंतर पुण्यापासून हि सर्व ठिकाण १००+ किमी वर आहेत त्यामुळे कधी कधी प्रवास कंटाळवाणा होऊ शकतो. 
 
शुक्रवारी वीकएंड म्हणत कार्यालयीन कामे संपवताना ११ वाजले आणि पुण्यातून निघताना जवळपास ११:३० झाले.
 रतनगड ला जाण्यासाठी पुण्याकडून ३ रस्ते आहे हे सर्व रस्ते अखेरीस भंडारदरा जवळ मिळतात फक्त पुणे नाशिक महामार्ग आपण कुठे सोडतो यावर हे अवलबूंन आहे. हे मार्ग अनुक्रमे ओतूर, बोटा आणि संगमनेर वरून जातात. आम्ही रात्री प्रवास करणार असल्याने आम्ही संगमनेर वरून जाणारा मार्ग निवडला. हा सर्वात दुरून जाणारा मार्ग आहे.संगमनेर वरून मालपाणी कंपनी (इथे काहींनी फॅक्टरी आउटलेट आहे का म्हणून चर्चा केलीच 😜) समोर आम्ही पुणे नाशिक मार्ग सोडला. आणि अकोले च्या दिशेने निघालो. यापूर्वी जेव्हा रतनगड ला आलो होतो तेव्हा खूप पाऊस होता आणि असाच रात्री प्रवास करत आम्ही आलो होतो. तेव्हा एक तपकिरी रंगाच्या तरसाचे दर्शन झाले होते. आजपण निघताना अर्पित ला बोललो होतो कि आज पण एखादा तरस दिसला पाहिजे.
 
आज रस्ता खूप चांगला होता. अकोले पर्यंत ४-५ खड्डे सोडले तर काही त्रास झाला नाही. हळू हळू धुके रस्त्यावर येत होते त्यामुळे गाडीचा वेग कमी होता. अकोले सोडल्यावर थोडेसे राजूर च्या आधी आम्हाला एका पांढरे आणि अंगावर पुसटशे काळे पट्टे असणारे तरस दिसलेच. हे तरस गाडीच्या अगदीच जवळ होते आणि गाडीचा वेग कमी असल्याने छान पाहता आले. आमच्या दोन्ही गाडीतील (जागे असलेल्या) सर्वांना तरस पाहता आले. मग पुढे अजून काही दिसतंय का हे पाहण्याची आशा लागली. आणि भंडारदऱ्याच्या ५-७ किमी आधी एक कोल्हा दिसला मग काय दुधात साखर !
 
असेच आम्ही मग अभयारण्याच्या गेट जवळ पोहचलो आज चक्क गेट रात्री बंद होता. आणि तेथे रीतसर फी भरून आम्ही आतल्या रस्त्याला लागलो. आतल्या रस्त्याच्या गुणवत्तेत काडीचा फरक पडलेला नाहीये. त्यामुळे पुढच्या १६-२० किमी ला आम्हाला तब्बल १-१:२५ तास लागला. आम्ही अखेरीस ५ वाजता रतनवाडीत पोहचलो. गाडी पार्किंग मध्ये पार्क करून स्लीपिंग बॅग घेऊन कुठे जागा मिळतिये का याचा शोध घेतला. आमचे ३-४ लोक गाडीतच झोपले बाकी आम्ही एका वनविभागाच्या हट खाली जागी पाहून झोपून घेतले. ३० मिनिटाच्या नावापुरता घेतलेल्या झोपेतून उठून आम्ही जोशात कॉफी आणि मॅगी बनवली आणि ती पोटात ढकलून आवराआवर चालू केली. 
 
सर्व बॅग आणि इतर गोष्टी घेऊन आम्ही जवळच्या टपरीवर पुन्हा पोहे, चहा आणि पारले जी वर ताव मारला. एव्हाना चांगलेच उजाडले होते. काही जत्रा फिरवणारे ट्रेक गृपचालक चांगल्या दोन मोठ्या बस घेऊन आले होते. हि जत्रा आपल्या मार्गाने यायला नको अशी इच्छा मनात ठेवून आम्ही जवळ गाईड पाहायला लागलो.       
 
यापूर्वी २ वेळा रतनगड केला आहे आणि दोन्ही वेळी वेगळ्या मार्गाने केला आहे. यातील दुसऱ्या वेळी जेवढ्या पावसात रतनगड केला होता आणि सह्याद्रीने जेवढे भरभरून त्याच्या सुंदरतेचे आणि रुद्रावताराचे  दर्शन दिले होते ते शब्दात मांडणे कठीण आहे. आणि भरपूर पाऊस असल्याने त्या ट्रेक ला एकपण कॅमेरा नव्हता त्यामुळे जे पहिले ते डोळ्यात आणि मनात साठवले असे आहे. ट्रेक मधील काही निसर्गदृश्ये फक्त एकदाच दिसतात नंतर कितीही वेळ आणि नियोजन करून गेले तर ते पुन्हा पाहायला मिळेल का नाही याची शाश्वती नाही त्याच प्रकारात तो ट्रेक होता. असो तो ट्रेक करताना आम्ही साम्रद दरवाजाने वर गेलो होतो यंदा पण तिकडूनच जायचे हे ठरले होतो.
 
खुट्टा सुळका व मागे दिसणारे अलंग, मदन व कुलंग

साम्रद दरवाजाची वाट साम्रद गावातून चांगलीच मळलेली आहे. पण रतनवाडीतून जरा जंगलातून जाणारी आहे त्यामुळे वाटकारी घेऊनजाऊ असा बेत होताच. एक वाटकरी (सचिन ) घेऊन आम्ही ग्रुपची जत्रा टाळावी म्हणून लगेच निघालो. वर चढताना एका बाजूला भंडारदऱ्याच्या जलाशय आणि एका बाजूला जंगल असे आम्ही निघालो. सचिन ने नेहमीपेक्षा वेगळ्या वाटेने आम्हाला नेले. आणि अंगावर येणारी चढण चढून आम्ही एका पठारावर आलो. 
 
खुट्टा सुळका

 पठारावर चांगलेच गवत होते आणि त्यामुळे सर्वदूर दिसणारे हिरवे गालिचे डोळ्याला सुखावत होते. उभ्या चढणीमुळे चांगलीच दमछाक झाली होती. त्यामुळे थोडा आराम करून आम्ही निघालो. आता खुट्टा सुळका डावीकडे, उजवीकडे आणि केव्हा समोर ठेऊन आम्ही पुन्हा जंगलात चाललो होतो. थोड्याच वेळात साम्रदच्या दिशेने येणाऱ्या वाटेला आम्ही येऊन मिळालो. इथून साम्रद च्या कोकणकड्यावरून वाहणारा उलटा धबधबा डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो. 
 
बाण सुळका, साम्रद चा कोकणकडा आणि रिव्हर्स वॉटरफॉल

आता साम्रद दरवाजाकडे जाणाऱ्या वाटेल लागलो. आता इथे रेलिंग वगैरे उभारली आहे. साम्रद दरवाजाच्या उभ्या पायऱ्या चढताना पुन्हा भर पावसात केलेल्या ट्रेक ची आठवण आली. सध्याची चढण रेलिंगमुळे काहीशी सोपी आहे.पण तुटलेल्या उंच पायऱ्या आणि शेवाळ्यामुळे थोड्या निसरड्या झाल्या होत्या त्यामुळे थोडेसे जपूनच आम्ही वरती दरवाजा जवळ पोहचलो. इथून दिसणारे निसर्गाचे सौंदर्य म्हणजे अवर्णनीय आहे. पुढे साम्रद दरवाजा पार करून आम्ही आणखी वरती आलो. 
 
कारवी

इथे निसर्गाने अगदी मुक्त हस्ताने सौंदर्याची लयलूट केली होती. सोप्या शब्दात सांगायचे तर कारवी फुलली होती. तर कारवी (Strobilanthes callosa) म्हणजे एक निसर्गाची किमया म्हणावी लागेल. हे एक झुडूप प्रकारातील आहे. याचा साधारणतः जीवनकाळ ७-८ वर्षाचा असतो. प्रत्येक वर्षी याला नवीन पाने येऊन उन्हाळ्यात हे झाड पूर्ण सुकून जाते. पण ८ व्या  वर्षी. याला पालवीबरोबर गुलाबी, जांभळ्या सुंदर फुलांनी हे झाड बहरून जाते. ८ वर्षांनी येणाऱ्या फुलानंतर या झाडाचे आयुष्य संपून झाड छोटी छोटी फळे देऊन जळून जाते. असे या कारवीच्या फुलांबाबत मला जेव्हा मी पहिला-दुसरा ट्रेक भोर मावळात  केला होता तेव्हा माहिती मिळाली होती. तेव्हा पासून हि फुलं एकदातरी या जीवनात पाहायला मिळावी अशी उत्कंठा होतीच. आज तो योग जुळून आला. ज्यांनी लव्हेंडर ची शेती पाहिली आहे त्यांना प्रथमदर्शीनी तोच भास होईल इतकी सुंदर फुले कारवीची असतात. 
 
कारवी ची चादर
 
इथे भरमसाठ फोटो काढून आम्ही हे दृश्य डोळ्यात साठवून आम्ही रतनगडाच्या नेढ्याच्या दिशेने वरती चढू लागलो. आजूबाजूला सर्वीकडेच कारवी फुलली होती जे या पूर्वी रतनगडावर आले असतील त्यांना मान्सून काळात वरती येणारे दाट गवत माहिती असेल तेच सर्व गवत आता फुलांनी बहरले होते. नेढे या पूर्वी पाहिले असल्याने त्या बाबत जास्त काही आकर्षण नव्हते.😅 पण यंदा वातावरणपण खूप छान होते त्यामुळे वरती नेढ्यात जाऊन छान हवा खाल्ली. आता नेढ्याच्या पलीकडून आम्ही गणेश दरवाजाकडे जाणारी वाट धरली. पुन्हा दोन्ही बाजूनी फुललेल्या कारवीतून जाताना छान वाटत होते. 
 
इथलं तीव्र उतार उतरून आम्ही खाली टाकी आणि त्रंबक दरवाजा जवळ आलो. मी पहिल्यांदाच या दरवाजाकडे आलो होतो. दरवाजा बराच चांगल्या स्थितीत आहे बाजूचा तट देखील शाबूत आहे. इथे थोडे थांबून आम्ही गोल बुरुजाकडे जायच्या वाटेल लागलो. इथे मात्र दोन - तीन जत्रावाले ग्रुप होते. त्यांचा कारवीच्या झुडुपात Reels बनवण्याचा प्रयत्न चालू होता. "बरं झालं लवकर आलो" असं म्हणून स्वतःची पाठ थोपून आम्ही बुरुजाकडे आलो एव्हाना ऊन चांगलेच आले होते आणि भूक पण जाणवत होती. त्यामुळे खालच्या गुहेत जाऊन काहीतरी खाऊ असा विचार झाला त्यामुळे उजवीकडचा नेढ्याकडची वाट टाळून थोडे पुढे जाऊन गडाच्या टोकाला आलो.
 
कात्राबाई सुळका
 
आज आकाश मोकळे असल्याने समोरची डोंगररांग स्पष्ट दिसत होती त्यामुळे कात्राबाई सुळका आणि कडा छान पाहता आला. इथे काही टाक्या आणि समोरचा तट चांगल्या स्थितीत आहे. इथून तसेच गणेश दरवाजाकडे आम्ही उतरलो. या दरवाजावर एक सुबक गणपती कोरलेला आहे त्यामुळे याला सर्व गणेश दरवाजा म्हणतात. 
इथून शिडीने खाली उतरून डाव्या बाजूला मोठ्या गुहा आहेत. इथे टेन्ट लावून मुक्काम करता येतो. घाट वाटा करताना रतनगड चा मुक्काम महत्वाचा ठरतो. इथेच थोडी विश्रांती घेऊन आम्ही थोडे चिक्की, खजूर वैगरे पोटात ढकलून पुढे खाली उतरायचा निर्णय घेतला. 
 
गणेश दरवाज्याच्या वाटेने शिडीने खाली उतरायला लागलो एव्हाना सूर्य चांगलाच डोक्यावर आला होता. आणि वाटेत छोटे छोटे ग्रुप भेटत होते. वातावरण तापल्याने उतरताना सुद्धा चांगलीच दमछाक होत होती. यामुळे जागतिक तापमान वाढ या विषयावर चर्चा सुद्धा चांगली रंगली. अखेरीस चांगले तासभर जंगल, मधेच डोंगराचे छोटे पठार असे करत आम्ही सपाटीवर आलो. आमच्याबरोबर आलेल्या वाटकऱ्याला निरोप देऊन आम्ही येताना एका पाहून ठेवल्याला बंधाऱ्यात डुंबून आम्ही पुन्हा गावात आलो. 

रतनवाडी गाव तसे खूप छोटे पण आजूबाजूला निसर्गाने भरभरून दिलेल्या आकर्षणामुळे इथे सुटीच्या दिवशी वर्दळ असतेच. तसेच गावात महादेवाचे पुरातन मंदिर आहे. मंदिर कोरीव असून खूप सुबक आहे.पुरातत्व खात्याने इथे छान सुधारणा केल्या आहेत. इथे मंदिराजवळ एक बारव आहे त्यात पाषाणात कोरलेल्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत. इथे मंदिर परिसरात जर बसून आम्ही आमच्या ट्रेक चा समारोप केला. 
 
यानंतर अगदी पुढच्याच आठवड्यात इंस्टाग्राम आणि इतर समाजमाध्यमवर आलेले कारवी आणि रतनगडावर बाजारू लोकांनी केलेल्या गर्दीचे व्हिडीओ पाहिले आणि अनुत्तरित झालो. 
 
सदर ट्रेक अवघड नसला तरी मान्सून मध्ये किंवा नंतर करताना थोडा काळजीपूर्वक करावा लागतो. बाकी चालण्याचा सराव असेल तर तुम्ही हा ट्रेक सहज करू शकता. मान्सूनचा शेवटचा काळ हा ट्रेक करण्यासाठी उत्तम आहे. 
 
आपण जर डोंगरात अथवा निसर्गात भटकंती ला जात असाल तर निसर्गाचा आदर करा. आठवणी खेरीज दुसरे काही बरोबर घेऊन जाऊन नका आणि पाउणखुणा सोडून मागे काही ठेऊन जाऊ नका. प्लास्टिक चा कमीत कमी वापर करा. आणि आपण आणलेला कचरा आपणच खाली घेऊन जा. 🙏 गडाची स्वछता राखा.

तळटीप: सदर ट्रेक मागील वर्षी सप्टेंबर काळात केला आहे. यानंतर खूप ट्रेक झाले पण दुनियादारी आणि कार्यालयीन कामामुळे लिहणे खूप मागे पडले. तरी कारवी असेल म्हणून आता कोणी गडावर जाऊ नये.

Comments

  1. खूपच छान वर्णन केले आहे मित्रा. आठवणी पुन्हा ताज्या केल्या तू..

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts