राजगड

Rajgad- Suvela Machi

राजगड

ठिकाण: (गुंजवणे) भोर मावळ
काठिण्य पातळी: मध्यम 

मागील मोठ्या ट्रेक नंतर काही नवीन ट्रेक चा मुहूर्त निघत नव्हता. त्याला कारणेपण तशीच होती सरकारी लॉकडाऊन नियमात काही शिथिलता नव्हती, वयक्तिक आयुष्यात पण खूप गुरफटलेले होतो. अखेरीस हो नाही करता एक दिवस सुट्टी घेऊन रतनगड आणि शनिवारी-रविवारी राजगड-तोरणा करू असे ठरले. त्यात सुट्टी काही मिळाली नाही मग राजगड-तोरणा चा बेत नक्की केला.

पुन्हा जत्रा सदृश्य गर्दी टाळण्यासाठी शुक्रवारी रात्री राजगडावर पोहचून शनिवारी पहाटे तोरणाकडे कूच करण्याचा बेत आखला. आता वेल्ह्यात उतरायचे असल्याने स्वतःची गाडी न नेण्याचा निर्णय घेतला. आता खरा प्रश्न असा होता की मी आणि अर्पितने दोघांनीही राजगड- तोरणा यापूर्वी केला होता. पण प्रत्येकवेळेस वयक्तिक बस किंवा गाडी घेऊन प्रवास केला होता. त्यामुळे गुंजवणे ला नेमकी गाडी कोणती जाते याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो. वाट पाहीन पण एस.टी. ने जाईन या उक्तीला अनुसरून आम्ही बस चा शोध चालू केला. स्वारगेट वरून एक राजगड बस असते असे आम्हाला जाणकारांनी सांगितले. म्हणून स्वारगेट ला फोन केला, 2 दिवसाच्या अथक परिश्रम आणि ५-२५ वेळा फोन फिरवल्यावर आमचा फोन उचलला गेला आणि सांगितले की राजगड गाडी सध्या बंद आहे त्यामुळे वेल्हा गाडी पकडा आणि रस्त्यात उतरा. मग हीच ती आपली गाडी असे ठरवून शुक्रवारी यानेच प्रवास करायचा असे ठरले.

शुक्रवारी अर्धवेळ रजा टाकून दुपारी आमची भली मोठी ट्रेकिंग बॅग खांद्यावर टाकून आम्ही स्वारगेट ला पोहचलो. आमचा अवतार पाहून लोकांनी प्रश्न केलाच की कुठे ? रायडींग ला का ? 🙈 त्यांना हसूनच नाही म्हणून आम्ही सातारा रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांच्या फलाटावर आलो. तिथे चौकशी केल्यावर कळले की वेल्हा गाडी येऊन गेली आता सध्या भोर गाडीत बसा आणि चेलाडी फाट्यावर उतरा आणि पुन्हा दुसरी गाडी पकडा. 🤦 त्या गाडीच्या वाहकाला विचारले की गुंजवणे ला जायचे आहे, आणि जीवनात मोक्याच्या क्षणी काही माणसे भेटतात जी योग्य वाट दाखवतात त्या यादीत या काकांना आम्ही टाकून दिले. त्यांनी सांगितले या गाडीत येऊ नका मागून रोहिणी(😅) गाडी येतेय ती तुम्हाला मार्गासनी ला सोडेल तिथून तुम्ही गुंजवणे ला जाऊ शकता. त्यांनी गाडीचा नंबरपण सांगितला; मग त्या गाडीची चांगली १०-१५ मिनिटे वाट पाहिली आणि बोर्ड नसलेली पण त्या नंबरची गाडी फलाटावर अवतरली. शिट्टी वाजवून गाडी व्यवस्थित लावायचा कार्यक्रम झाला आणि वाहकाला आम्ही विचारले 

"रोहिणी हीच का ?"
वाहक: अहो रोहिणी नाही गृहिणी

आम्हाला काही झेपले नाही, शेवटी त्यांना विचारले मार्गासनी ला जायचे आहे, ते बोलले हीच गाडी. त्यांनी विचारले "गडावर का ?" आम्ही खूष आम्ही चटकन गाडीत बसलो आणि चालकाने गाडीला बोर्ड लावला 'पुणे - गृहिणी' 😅 
 

 

गाडीत जेमतेम ४ प्रवासी आणि आम्ही, गाडी पुण्यातून निघाली. एसटी मध्ये खिडकीची जागा पकडून झोपायची मजा काही औरच असते. त्याचा आम्ही नसरापूर येईपर्यंत चांगला लाभ घेतला. आता पुढे मार्गासनी नक्की कुठे हे महिती नव्हते, त्यामुळे वाहकाला विचारले ते बोलले काही काळजी करू नका मार्गासनी आले की आवाज देतो. मग आम्ही निर्धास्त झालो. खिडकीबाहेर भात शेती आपण मावळात प्रवेश करतोय याची जाणीव करून देत होती. शेती वाऱ्याने डोलत होती सर्विकडे हिरवेगार आणि आभाळ झोकाळून आले होते. थोड्याच वेळात  गुगल मॅप च्या "You arrived at your destination" पेक्षा दमदार मार्गासनी असा आवाज आला, आणि आम्ही उतरलो.

मार्गासनी हे वेल्हे रस्त्यावरचे छोटे गाव.  पीएमटी चा लाल बोर्ड इथे पीएमटी येते याची माहिती देत होता. इथून गुंजवणे जवळपास ६ किलोमीटर आहे. आपल्याला काही गाडी मिळणार नाही अशी मनाची समजूत घालून,  आम्ही चालतच गुंजवणे कडे निघालो. आणि थोड्या पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस आमची चांगलीच सोबत करणार होता. थोडे चालून गेल्यावर एक कार येत होती त्यातील सागर भाऊंनी आम्हाला साखर गावापर्यंत सोडले आणि सांगितले कोणाची वाट पाहू नका असेच चालत रहा रस्त्यात कोणी भेटले तर गुंजवणे ला सोडतील. साखर पासून २ किमी वर एक दुधाची गाडी मिळाली त्यांनी गुंजवणे पासून १-२ किमी मागे सोडले. इथून गुंजवणे पर्यंत काही मिळाले नाही त्यामुळे रस्ता तुडवत पावसाच्या सरी झेलत आम्ही ७ वाजेला गावात पोहचलो. 

एव्हाना चांगलेच अंधारून आले होते. भूकपण जोरात लागली होती. गावात काही खायला मिळेल या आशेवर एका हॉटेल मध्ये विचारले तर फक्त भेळ मिळेल म्हणून सांगितले. पाऊस पडत होताच तिथे अर्पित ला थांबवून गावात गेलो. सुवेळा माची नावाच्या हॉटेल मध्ये विचारले त्या काकूंनी सांगितले की आज काही बनवले नाही. 

घरात काही बनवले असेल ते पण चालेल
काकू: बोंबील बटाटा आहे
श्रावणात बोंबील म्हंटल्यावर मनाची द्विधा स्थिती झाली 🙈🙈
शेवटी काकूंनी बेसन भाकरी चालेल का म्हणून विचारले
मी: बेस्ट!

अर्पित ला घेऊन येई पर्यंत किचन मधून पिठल्याचा मस्त वास येत होता.

आमचे जेवण होईपर्यंत जोरात पाऊस सुरू झाला होता. जेवण झाल्यावर पाऊस कमी होण्याची वाट पाहत होतो. आता ७ चा अंधार आणि १० चा अंधार आम्हाला सारखाच होता त्यामुळे पावसात चालू करण्यापेक्षा थोडा कमी झाला की निघू असे ठरले. तेथील काकांशी गप्पा मारताना कळले की तोरण्याचे सर्व दरवाजे बंद आहेत. 🤦 सर्व मुसळ केरात. मग तोरण्याचा बेत रद्द करून फक्त राजगड फिरू असा बेत आखला. एकदाचा पाऊस ८-८:३० ला कमी झाला. मग बॅग पाठीवर टाकून डोक्याला टॉर्च लावून आम्ही चढाई चालू केली.

मिट्ट काळोख, हवेतील आद्रता आणि वरून पडणारा पाऊस यात आमचा ट्रेक चालू झाला. वाट थोडी माहितीत होती त्यामुळे आम्ही ओळखीच्या खुणा शोधत चाललो होतो. आद्रतेमुळे खूप उकडत होते त्यात विंडचिटर यामुळे पावसापेक्षा घामानेच मी ओला झालो होतो. थोड्या चढाईनंतर श्वास चांगलाच फुलला होता, पण एकदा त्याची सवय झाली तासभर चढाई केल्यावर एकदाची रेलिंग लागली. हीच खूण की आता थोडी उभी चढाई आहे, थोडे चढून गेल्यावर जाणवले की ही तर नवीन रेलिंग आहे म्हणजे ओळखीची रेलिंग अजून आली नाही ही चढण थोडी अंगावर आली होती थोड्या वेळापूर्वी जेवलेले पोटात कुठे गायब झाले असे वाटत होते. आणि अखेरीस ओळखीची रेलिंग आली. ही शेवटची उभी चढाई आहे ती चढून आम्ही चोर दरवाजात पोहचलो.


हा चोर दरवाजा म्हणजे चांगलेच वाकून आत जावे लागेल इतका छोटा आहे. यातून आत गेले की ३-४ पाहिऱ्या चढून गेल्यावर पद्मावती तलाव नजरेत येतो. एवढ्या काळोखात कुठे तलाव आणि कुठे जमीन काही दिसायला मार्ग नव्हता. डोक्यावरचे टॉर्च चा प्रकाश पाण्यावरून गायब होत होता. थोडी धाकधूक होतीच चुकून पाण्यात नको जायला 😅 इथे पूर्वी एक सोलर पॅनल चा लॅम्प होता. डाव्या बाजूला शेवटी पायऱ्या नजरेत आल्या, त्या चढून वर नवीन बांधलेल्या पायऱ्या दिसल्या मग थोडा चालायला वेग घेतला. लगेचच माचीवरचे पद्मावतीचे मंदिर नजरेत आले. आम्ही जवळपास २ तासात वरती आलो होतो.

मंदिराचा दरवाजा बंद होता आणि बाहेर काही चपला होत्या. आम्ही म्हंटलो चला कोणीतरी सोबतीला आहे. आत मध्ये  आमच्या सारखेच 2 छोटे ग्रुप होते. त्यांनी आत तंबू लावून झोपायची तयारी केली होती. गप्पा मारताना कळले की ते पाली दरवाजाने वर आले होते. आम्ही जेवून आलो होतोच आता फक्त झोपायचे बाकी होते. बॅग ठीकठाक लावून कोरडे कपडे घालून आम्ही आपापल्या स्लीपिंग बॅग मध्ये गुडूप झालो. रात्री पावसाचा जोर चांगलाच जाणवत होता. पहाटे अजून ३-४ जणांचा ग्रुप मंदिरात आला. ते बहाद्दर तर आले तास दोन तास  बसले आणि पहाटेच्या अंधारात पुन्हा गायब झाले.


५:३० जाग आली पाऊस भुरभुरत होताच, बाहेर जाऊन अंदाज घेतला तर सर्व गड धुक्यात गायब झाला होता. आत येऊन बॅग गुंडाळून ठेवली. अर्पित च्या स्लपिंग बॅग खाली काही मुंगळे दिसले त्याला जागे करून सांगितले की काही मुंगळे खाली आहे त्याने उठून बॅग बाजूला केली तर लक्षात आले की जिथे आम्ही झोपलो होतो त्या फरशीखालून बरेच मुंगळे बाहेर येत होते. तेवढ्यात एक दोन चावलेच. आम्ही आपल्या बॅग आवरून घेतल्या या गडबडीत कॅमेऱ्याची बॅग कोनाड्यातून खाली फरशीवर पडली थोडा आवाज झाला, बॅग उघडायची हिम्मत होत नव्हती. शेवटी कशीबशी उघडली  आणि आत पाहिले छोट्या किट लेन्स ला दणका बसला होता आणि ती वापरण्याजोगी राहिली नव्हती. चरफडत ती पुन्हा आत ठेवली आज काहीएक फोटो काढता येणार नाही हे दुःख होतेच, पण लेन्स तुटल्याचे दुःख मोठे होते. बाकी ग्रुपचे लोक उठले होते त्यांनी चहा केला होता आम्हाला देखील त्यात चहा मिळाला. चहा घेऊन आम्ही बालेकिल्ल्यावर जायचा बेत केला.

राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी, हा पूर्वी छोटा किल्ला होता महाराजांनी त्यावरील  तीन मोठ्या माच्यांना तटबंदी आणि अजस्त्र बालेकिल्ला बांधून घेतला. राजगड वरून पाहिला तर पंख्याचे वर्णन करता येईल असा आहे. राजगडाच्या तीन माची सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती म्हणजे पंख्याची तीन पाती आणि मध्ये उंचावर बालेकिल्ला. राजगडाला ऐतिहासिक महत्व खूप आहे, महाराज स्वतःह गडावर खूप काळ राहिले. आग्र्याहून सुटका करून महाराज इथेच राजगडावर परत आले. तानाजी मालसुरे सिंहगडाच्या मोहिमेला इथूनच गेले, अजूनही कितीतरी. संपूर्ण राजगड पाहायचा तर कमीतकमी २ दिवस लागतात. आमच्याकडे आजचाच दिवस होता त्यामुळे बालेकिल्ला आणि एक माची फिरून येऊ असा आम्ही बेत केला. त्यात पाऊस आणि धुके सोबतीला होते जास्तीत जास्त २० मी पर्यंत दिसत होते त्यामुळे बालेकिल्यातून इतर गड दिसायची शक्यता नव्हतीच. आम्हाला तेथून संजीवनी माची दिसली तरी आम्ही खुश होणार होतो. 

मोठ्या बॅग मंदिरात ठेऊन फक्त कॅमेरा बॅग घेऊन धुक्यात चालत निघालो. सदर पार करून बालेकिल्ल्याच्या वाटेला लागलो. थोडे चालून बालेकिल्ल्याची उभी चढाई लागली इथेपण रेलिंग आहे त्यामुळे एवढे काही कठीण वाटले नाही पण सर्विकडे पाणी वाहत होते त्यामुळे जरासे जपूनच आम्ही वर चढत होतो. धुक्यामुळे पुढचा टप्पा काही नजरेत येत नव्हता पण हळूहळू आम्ही महादरवाजा जवळ आलो. महादरवाजा अतिशय चांगल्या स्थितीत आहे. तिथे थोडे विसावून आम्ही जननी देवीच्या मंदिराच्या बाजूच्या पायऱ्यांनी वरती निघालो. पुढे अतिशय सुंदर असे चंद्रकोरीच्या आकाराचे तळे आहे. त्याचे नाव देखील चंद्रतळे असेच आहे. आम्ही चांगलीच उंची गाठली होती पण या वरती देखील वास्तू आहे. 

चंद्रतळ्याच्या बाजूलाच ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे इथून एक बुरुज आहे तिथून पूर्ण पद्मावती माची दिसते. हा बुरूज उत्तरबुरुज म्हणून ओळखला जातो. इथे मंदिराजवळ आम्हाला एक कुटुंब भेटले त्यांचा अल्पोपहार चालू होता. त्यांना विचारले तर ते देखील पुण्यातून आले होते आणि पहाटे ४ ला पाली दरवाजाणे त्यांनी सुरवात केली होती. ४ ला सुरवात म्हणजे पुण्यातून ते निश्चित  रात्री २ ला निघाले असतील, त्या कुटुंबातली काकूंनी मनोमन सलाम ठोकून आम्ही बालेकिल्ल्याच्या वरच्या भागात चढून आलो. इथे राजवाड्याचे अवशेष आहे, इथे एका टोकाला आम्ही धुक्यात संजीवनी माची शोधत बसलो. तिथेच आमच्या  चिक्कीचा आस्वाद घेऊन पुढे एक माची फिरून येऊ असे ठरले. मग आलो त्या वाटेने उतरत पुन्हा महाद्वाराजवळ आलो आणि बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली. इथे उतरताना खूप काळजीपूर्वक उतरावे लागत होते. रेलींग होतीच पण सर्विकडे पाणी वाहत होतो त्यामुळे सावधपणे उतरत आम्ही पुन्हा खाली आलो.

आता संजीवनी माची फिरून येऊ अस ठरले आम्ही थोडे चालून देखील गेलो पण पूर्ण माची धुक्यात हरवली होती, त्यामुळे बघायला काही मिळेल याबाबत शंका होती. संजीवनी माची ही चांगलीच २ ते ३ किमी  लांबीची आहे, त्यामुळे तिकडे जाऊन पुन्हा परत येण्यासाठी २ तास सहज लागणार होते. मग हा बेत रद्द करून आम्ही मागे फिरून सुवेळा माचीकडे निघालो ही वाट आम्हाला थोडी नवीन होती त्यात धुके त्यामुळे माचीकडे जाताना एक छोटी टेकडी लागते तिथे आम्ही गेलो. इथून माचीकडे जाण्यासाठी चांगली वाट नाही 🤦 आम्ही एका निसरड्या वाटेने कसेबसे कपडे चिखलात खराब करून पुन्हा माचीच्या वाटेला लागलो, इथे एक मारुतीची छोटीशी मूर्ती आहे. 
Suvela Machi
 
इथून माचीकडे सरळसोट वाट आहे. आणि मग समोर आला माचीचा चिलखत बुरुज वरती चढायचा मोह टाळून आम्ही उजव्या वाटेने तटबंदीच्या खालच्या भागात आलो इथे तटबंदीत एक गणपती कोरलेला आहे. थोडे पुढे जाऊन एक चोरवाट आहे आणि तसेच पुढे जाऊन राजगडावरचे नेढे आहे. मला आता भयंकर भूक लागली होती त्यामुळे माझा उत्साह थोडा मावळतीकडे होता पण पुढे नभाला चिरणारी तटबंदीपण मागे फिरू देत नव्हती, शेवटी अर्पित ला नेढे पहायचे होते मग तो नेढे पाहण्यासाठी वरती गेला आणि मी तटबंदीवरुन पुढे. पुढे जाऊन मागे वळून पाहिले आणि या भागाला हस्तिप्रस्तर का म्हणतात हे ध्यानात आले. हत्तीच्या तोंडाच्या आकाराच्या त्या दगडात ते नेढे स्थिरावले आहे. इथेच खाली अजून एक चोर दरवाजा आहे, तो देखील पाहून घेतला. आता मात्र माचीचे शेवटचे टोक पाहायचा निर्णय मागे घ्यावा लागला. पाणी पण जवळपास संपले होते आणि भूक पण जाणवत होती. मग मागे फिरून पुन्हा बुरुजावर चढून मोबाईल मध्ये काही फोटो घेऊच आणि मग जाऊ असे ठरवले. वरती चढून माचीचे टोक दिसेल असे वाटले पण धुक्याने ते पण शक्य झाले नाही.
Sanjivani Machi - Rajgad

मग मागे फिरून आम्ही पुन्हा पद्मावती मंदिराकडे चालायला लागलो वाटेत बरेच लोक भेटत होते सर्व एक दिवसात राजगड पाहण्याच्या आशेने आले होते. 🙄 आम्ही एकदाचे मंदिरात पोहचलो सकाळचा चहा , चिक्की पोटाच्या कोपऱ्यात गायब झाले होते पण अर्पित ने सुचवले पाहिले थोडे तलावाजवळ जाऊन हात पाय धुवू मग जेवन करू.   मग ते सर्व करून आम्ही पुन्हा मंदिरात आलो. भाकरी आम्ही घरून आणल्या होत्या मग चितळे आम्रखंड, शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी असा बेत होता. रात्री जे आमच्या बरोबर मुक्कामाला होते त्यांनी जेवण करून, भांडी धुवून सर्व सामान बांधून ठेवले होते आम्हाला कांदा आणि टोमॅटो देऊन ते पुन्हा गड उतरायला लागले. आम्ही पण जेवण करून सामान बांधून मंदिराबाहेर येऊन बसलो. आता  नेमके धुकं कमी होऊन सूर्यप्रकाश खाली येत होता, बालेकिल्ला अजूनही धुक्यात लपला होता. एकदा वाटले असेच धावत धावत संजीवनी माचीवर जावे. पण नुकतेच पोटात गेलेलं जेवण आणि परतीच्या बसचे नियोजन यामुळे आम्ही आमच्या इच्छेवर थोडी मुरड घातली.
 
Rajgad- Clear Sky
 
मग तसेच उन्हात पद्मावती मंदिरासमोर निवांत बसून आराम केला. तिथेच काही राजगडला नेहमी भेट देणारे गिरिप्रेमी भेटले. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी परतीला जाताना एक वेगळा मार्ग सुचवला. तसे वरती उल्लेख करायचा राहून गेला पण राजगडावर येण्यासाठी बरेच मार्ग आहेत. 

१. चोर दरवाजा(पद्मावती माची): गुंजवणे गावातून पद्मावती माचीचा चोर दरवाजा. वाट चांगलीच मळलेली आहे.
याच दरवाजात वाजेघर मार्गे बाबुदा झापा पर्यंत (ज्यांनी गोनीदांचे दुर्गभ्रमणगाथा वाचले आहे त्यांना राजगड आणि बाबुदा हे आठवत असतील त्यांच्याच घरातील हणमंती सध्या इथेच झापावर राहतात. ) येऊन पुन्हा सोंडेने वरती चढून येता येते. हीच वाट आम्हाला परती साठी सुचवली होती.

२. पाली दरवाजा: ही वाट पाबे गावातून थोडी पुढे आणि पूर्णपणे पायऱ्या असलेली वाट आहे. अतिशय सोपी.

३. गुंजवणे दरवाजा: ही वाट गुंजवणे गावातून आणि जंगलातून जाते. ही वाट माहितगार असल्याशिवाय जाऊ नये अशा प्रकारातील आहे.

४. चोर दरवाजा(सुवेळा माची): ही वाट देखील गुंजवणे आणि जंगलातून जाते. वाट थोडी अवघड आणि मळलेली नाही.

५. अळू दरवाजा(संजीवनी माची): ही वाट भुतोंडे मार्गे वरती येते. हीच वाट पकडून आम्ही तोरण्याकडे निघणार होतो.


तर आम्ही झापा पर्यंतची वाट वरतून पाहिली पण पुन्हा वाजेघर वरून मुख्य रस्त्याला येण्यासाठी काही मिळेल का याची शंका होती. म्हणून तो पर्याय रद्द केला आणि पुन्हा गुंजवणे गावाची वाट धरली. उतरताना आम्ही सावकाश उतरलो आणि २:३० तासाने गावात पोहचलो. इथून मार्गासनी पर्यंत पुन्हा चालत जाणे जिवावर आले होते मग इथून गावात एक रिक्षा मिळाली त्यांनी आम्हाला मार्गासनी ला सोडले.

इथून परतताना तोरण्याला न जाता आल्याची हुरहूर आणि बरोबरच ट्रेक संपताना नेहमी होणारी मनाची घालमेल होतीच.  पुन्हा राजगडावर मुक्कामाला येऊच असे बोलत आम्ही चाकोरीबद्ध शहरी जीवनात प्रवेश करण्यासाठी एसटी मध्ये बसलो आणि स्वछंदी, निसर्गरम्य परिसर सोडून पुण्याकडे निघालो.

आपण कुठेही ट्रेकिंग ला जाणार असाल तर प्लास्टिक चा कमीतकमी वापर करा. आणि आपण आणलेला कचरा आपणच खाली घेऊन जा. गड, किल्ले आणि निसर्गाची काळजी घ्या

ता.क: सोबत जोडलेले संजीवनी माचीचे प्रकाशचित्र हे मागील ट्रेक मधील आहे.

Comments

Popular Posts