कोरीगड/कोराईगड

कोरीगड/कोराईगड

Korigad

कोरीगड/कोराईगड
काठिण्य पातळी: सोपा
ठिकाण: पेठ शहापूर, अँबे व्हॅली जवळ.
 
मध्यंतरी झालेला अपघात यामुळे गिरिभ्रमंती जवळजवळ एक वर्षं मागे पडली. त्यात करोनाचे सावट म्हणजे आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. अखेरीस सरकारच्या कृपेने गड किल्ल्याच्या वाटा मोकळया झाला. आम्ही देखील एक दोन दिवसांचे छोटे ट्रेक आखायला सुरवात केली.
 
दोनदा हरिश्चंद्र गडाची मोहीम विविध कारणांमुळे (एकदा सरकार निर्णयात ट्रेकिंगच्या सूचना नसल्याने आणि दुसऱ्यांदा ऐन वेळेस आमच्या एका सहकाऱ्याने टांग दिल्याने) बासनात गुंडाळाव्या लागल्या. पण दुसऱ्या वेळेस मी आणि अर्पितने ठरवले सुट्टी आहे; नाही हरिश्चंद्र गड तर बाईकने जाता येईल असा एखादा जवळचा गड करायचाच. मग घनगड आणि कोरीगड शनिवारी सकाळी करायचा असा बेत नक्की झाला. दोन्ही गड एकदा केले असल्याने वेळेचा आणि वाटेचा अंदाज होता. अखेरीस शुक्रवारी रात्री कार्यालयीन कामांची अडथळ्यांची शर्यत पार पाडून शनिवारी फक्त कोरीगड करायचा हे निश्चित झालं.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला पिंपरी चिंचवड मधून अर्पितची बुलेट घेऊन सुरवात केली. नुकत्याच चालू झालेली थंडी चांगलीच जाणवत होती. आज पहिल्यांदा Quechua च्या विंडचिटरचा थंडी साठी वापर केला नाहीतर आजपर्यंत ते फक्त पावसात वापरले होते. 😅 रस्त्यात पुणे ते लोणावळा सायकलिंग करणारे बरेच ग्रुप्स दिसले.
लोणावळ्यात अर्पित ने सुचवलेल्या एका उडुपी रेस्टॉरंटमध्ये मध्ये जबरदस्त मेदूवड्याचा आस्वाद घेतला. (६ महिन्यात पहिल्यांदाच बाहेर खाण्याची मजा काही औरच 😋 ) तिथून लोणावळा तलावाच्या बाजूने, टायगर आणि लायन पॉईंट सोडून पुढे अँबे व्हॅली च्या रस्त्याने निघालो.
 
साधारण ९ ला गडाचे खालचे गाव पेठ शहापूर ला पोहचलो. तिथेच एका वाहनतळमध्ये गाडी लावली. (हेल्मेट ला लॉक लावायची सूचना तिथे पावती फाडणाऱ्या व्यक्तीने केली) . पेठ शहापूर हे छोटं गाव आहे. इथून कोरिगडाची सुरवात होत. सध्यातरी गडापासून दूर गाडी लावावी लागते आणि पायथ्यापर्यंत पायवाटेने चालत यावे लागते.
कोरिगडाचे सौंदर्य हे खरंतर पावसाळ्यात १०० पटीने वाढते. हिरवीगार दुलई पांघरलेला कोरीगड आणि गडाच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी म्हणजे लाजवाब. आज असा काही प्रकार नव्हता. ऑक्टोबर हिट मुळे आणि पावसाळा संपल्यामुळे हिरवं गवत नावाला देखील नव्हते. पण आज छान हवा होती. कोरीगडाला पायथ्यापासून शेवटपर्यंत पायऱ्या आहेत त्यामुळे सर्वांसाठी गड फार सोपा आहे.
 
तर सुरवात केल्यावर २५-५० पायऱ्यानंतर दमछाक झाली. एक वर्षाचा आराम आणि लॉकडाऊन मध्ये घरी बसून खाल्लेल्या विविध पदार्थामुळे वाढलेलं वजन जाणवत होते. 🙈 (आमच्या एका मित्राचं वाक्य आठवले भाई फेफडे जवाब दे रहे है। ) तरी हळूहळू श्वासोस्वास लयीत आल्यावर मग थकवा जाणवणे कमी झालं. तोपर्यन्त अर्ध्या वाटेवर आलो होतो. कोरिगडावर छोट्या मोठ्या आशा एकूण १०-१५ गुहा आहेत. त्यातील एक गुहा इथे दिसते बाहेर गुप्त गुफा असे लिहलेली पाटी लावली आहे. बाजुलाच एक छोटे मंदिर. ही गुहा प्रशस्त आहे बाहेरील बाजूला थोडी उथळ पण आतील बाजूला विस्तीर्ण. पूर्वीची चेक पोस्ट वगैरे असावी असा कयास बांधता येतो.
 
इथून पूढे चढताना काही दमछाक झाली नाही. एव्हान चांगला वॉर्म अप झाला होता त्यामुळे विंडचिटर घडी करून बॅगमध्ये गेला होता. पुढे पुण्यातील ३ काकांचा ग्रुप भेटला त्यांचा गृप फोटो काढून आम्ही वरती निघालो. पुढे थोड्या अंतरावर उजव्या बाजूला एका छोट्याश्या गुहेत एक पाण्याची टाक आहे. गडावरील बहुतांशी दुकानदार थंडगार आणि स्वच्छ पाणी इथून घेऊन जातात. थोडे वरती चढलो की दरवाज्याचा बुरुंज आणि तटबंदी नजरेत येते. इथून गडाचा मुख्य दरवाजा गणेश दरवाजा अगदी हाकेच्या अंतरावर आहे. दरवाज्याच्या बाजूचे बुरुज अजूनही सुस्थितीत आहे. इथून आत गेल्यावर छोट्या देवळ्या (पहारेकऱ्यासाठी छोटी जागा) आहे. इथून थोडे वर चढून गेलं की गड माथ्यावर यतो. समोरच एक महादेवाचं मंदिर आहे. यापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा संपूर्ण मंदिराचा परिसर हिरवागार होता. आज सर्विकडे पिवळे गवत होते. 
 
या गडाची तटबंदी आज देखील चांगल्या अवस्थेत आहे. गडावर सध्या विकासकामे चालू आहे. त्यात या तटबंदीची डागडुजी देखील चालू आहे. आम्ही तटबंदीवरुन चालत आमचा मोर्चा डावीकडे वळवला. डावीकडून गडाच्या दक्षिण टोकाला एक बुरुज आणि बंद पडलेला ट्रान्सफॉर्मर आहे. इथे बसून आम्ही आमचा ठरलेला एनर्जी बार म्हणजे शेंगदाण्याची चिक्की चा आस्वाद घेऊन अँबे व्हॅलीत दिसणाऱ्या घरांवर चर्चा करत बसलो. तिथून निघून दक्षिणेकडली तटबंदीवरुन गडाच्या दुसऱ्या टोकाकडे निघालो. इथे एक तोफ आहे (तीच नाव लक्ष्मी तोफ आहे हे नंतर कळलं). असेच उत्तरेकडे जाताना खाली अजून एक बुरुज दिसला आम्ही थोडा त्या वाटेवर जायचा प्रयत्न केला पण थोडी ढासळलेली वाट असल्याने पुढे जाण्याचे टाळले (नंतर पुण्यात आल्यावर थोडी माहिती मिळाल्यावर कळलं की तिथे गडावर येण्यासाठी एक वाट आहे जी अंबवणे गावात निघते) असेच तटबंदीवरुन चालत आम्ही कोराई देवी च्या मंदिराच्या मागे आलो. इथे पुन्हा वाटेत भेटलेला ग्रुप भेटला. तसेच पुढे उत्तरेला तटबंदीवरुन चालताना डावीकडे दोन छोटे तलाव लागले. आताच्या विकास कामामध्ये इथे दोन तलावांमध्ये २-३ बाक टाकले आहे. तिथे थोडे फोटो काढून आम्ही तसचे पुढे गडाच्या उत्तर टोकाकडे आलो. इथून पेठ शहापूर आणि बाजूचे अजून एक गाव दिसते.
Korigad

 
 
एव्हान ऊन चांगलेच तापू लागले होते. आम्ही इथून आता परतायला निघालो. परतीसाठी गडाच्या मागच्या तटबंदीवरुन निघालो. तेव्हा अजुन ३ - ४ गुहा आढळल्या. या गुहा बऱ्याच मोठ्या आणि काहीश्या लपवलेल्या वाटत होत्या. त्यातील एका गुहेच्या तोंडावर गणपतीची छोटी प्रतिकृती कोरलेली दिसली. इथेच एका गुहेत एक मध्यम आकाराची घोरपड देखील दिसली आणि तिला आदर देऊन आम्ही आत जायचा बेत रद्द केला. 😅
परतीच्या वाटेवर अजून एक दोन छोटे ग्रुप भेटले जे वरती येत होते. 
 
आलेल्या वाटेने आम्ही पुन्हा गड उतरून आलो. खाली येऊन थोडी विश्रांती घेऊन पुन्हा पुण्यासाठी रवाना झालो.
एकंदरीत कोरीगड एक दिवसात सहकुटुंब करता येण्यासारखा सोपा ट्रेक आहे. या गडाबाबत इतिहासात जास्त काही माहिती नाही. गडाच्या खाली दुर्गप्रेमींनी माहीत फलक लावला आहे त्यात काही प्रमाणात माहिती आहे. त्यात दिलेली एक माहिती अशी की इंग्रजांना गड घेताना फार कष्ट पडले. आणि गडाच्या तटबंदीवरुन ते सहज लक्षात येत. 
 
आपण जर कोणत्याही गडावर जाणार असाल तर प्लास्टिक चा कमीत कमी वापर करा. आणि आपण आणलेला कचरा आपणच खाली घेऊन जा. 🙏 गडाची स्वछता राखा.
आज पहिल्यांदा एक गिरिभ्रमंतीचा स्वानुभव लिहायचा प्रयत्न केला. आपल्या सूचना आणि अभिप्राय जरुर कळवा.

Comments

Popular Posts