शिवरात्र
शिवरात्र
शिवरात्र
लेखक: नरहर कुरुंदकर
प्रकाशक: देशमुख आणि कंपनी
"या देशातील अधिकाधिक लोक धार्मिक आहेत कारण त्यांनी धार्मिक पुस्तके वाचली नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे"
-नरहर कुरुंदकर
कुरुंदकरांच्या साहित्याची माझी पहिली ओळख वरील वाक्याने झाली. हे वाक्यच इतके धारदार होते की हे वाचून काही वेळ स्वतःशीच विचार करावा लागला. यानंतर कुरुंदकरांचं साहित्य वाचून पहायचे असे ठरवले. थोडा शोध घेतला आणि त्यांची शिवाजी जन्मरहस्य यावर काही भाषणे युट्युबवर सापडली त्यात त्यांचे तर्कशुद्ध आणि इतिहासाचे दाखले देऊन केलेलं जबरदस्त वक्तृत्व अनुभवले. ( आजच्या तरुण वर्गाने ती भाषणे आवर्जून ऐकावीत. )
पुढे शोध घेताना कळलं की कुरुंदकरांनी श्रीमानयोगी (लेखक: रणजित देसाई) च्या सुरवातीच्या आवृत्तीची प्रस्तावना लिहली होती. आणि ती प्रस्तावना देखील थोड्या प्रयासाने मिळाली. त्यात देखील इतिहासाला धरून केलेलं निर्भीड लिखाण वाचून प्रश्न पडला आजच्या आक्रमक भक्तांना ते पचनी पडले असते का ? (सदर प्रस्तावना नवीन आवृत्ती मध्ये उपलब्ध नाही.)
तर शिवरात्र या पुस्तकाकडे वळूयात हे पुस्तक म्हणजे वैचारिक आणि राजकीय लेखांचा संग्रह आहे. ईश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्या नास्तिक कुरुंदकरांनी आपल्या भारताच्या उज्ज्वल भवितव्यावर असलेल्या तर्कराहित श्रद्धा इथे नोंदवल्या आहेत. या श्रद्धांमुळेच त्यांनी शिव या मूल्याच्या आराधनेत जे जागरण केले आहे त्यातूनच शिवरात्र मधील लेख लिहले आहेत.
पुस्तक तीन भागांमध्ये आहे, पहिल्या भागामध्ये हिंदू जातीयवाद, हिंदुत्ववादी राजकारण यावर चिकित्सा करणारी विवेचन आहेत. यात काही कठोर प्रश्न विचारले गेले आहेत. दुसऱ्या भागात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोतर काळात हिंदू मुस्लिम ऐक्याचा विफल प्रयत्न केलेल्या व्यक्तींचा मागोवा घेतला आहे. आणि तिसऱ्या भागात भारतीय मुस्लिमांच्या धर्मनिष्ठेमुळे राष्ट्रनिष्ठेवर होणाऱ्या परिणामांची मीमांसा केली आहे.
या पुस्तकातील लेखांना काळाची मर्यादा नाही. हे लेख १९६०-१९८० या कालखंडातील आहे. पण यातील बरेच मुद्दे आजदेखील वाचकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतील असे आहे. वयक्तिक माझ्या तरी वाचनात वरील नाजूक प्रश्नावर दोन्ही बाजूने केलेलं तर्कशुद्ध लिखाण वाचण्यात आले नव्हते.
पुस्तक छोटे असले तरी चांगलेच वैचारिक आहे. त्यामुळे सरळसोट सर्वच वाचकांच्या पचनी पडेल असे नाही. पण तुम्हाला वैचारिक किंवा वरील विषयावर आधारित वाचायचे असेल किंवा करुंदकरांनी नाजूक विषयावर पुराव्यांचा आधार घेऊन केलेलं तर्कशुध्द भाष्य अनुभवायचे असेल तर नक्कीच वाचावे असे पुस्तक आहे.
Comments
Post a Comment