टाटायन

टाटायन


 

लेखक: गिरीश कुबेर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन

टाटा या नावानं भारतीयांच्या मनावर एक खोलवर असा ठसा उमटवला आहे. उदयोग विश्वात हे नाव फार आदराने घेतले जाते. तसेच टाटा समूहाचा देशाच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. या समूहाची अगदी सुरवतीपासूनची वाटचाल, आलेली आव्हाने आणि टाटा संस्कृती याची विस्तृत चर्चा या पुस्तकात केलेली आहे.

गिरीश कुबेर यांचं मी वाचलेलं हे ३ रे पुस्तक. या आधी 'हा तेल नावाचा इतिहास आहे' आणि 'एका तेलियाने' वाचले आणि लेखकाची लेखन शैली आणि अभ्यासपूर्वक लेखन आवडले. टाटायन मध्ये देखील असेच काहीतरी वाचायला मिळणार या अपेक्षेने पुस्तक घेतले. (मध्यन्तरी लॉकडाऊन काळात राजहंस प्रकाशन ने दिलेली भरखोस सूट हे देखील कारण होतेच 😅) आणि पुस्तकाने बिलकुल निराश केले नाही. एकतर आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटना आणि कंपनी यांचा उल्लेख आणि कुबेर शैलीत केलेली मांडणी यामुळे पुस्तक शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

तर पुस्तकाची सुरवात ही स्वातंत्र्यपूर्व काळात पाहिले टाटा नुसेरवानजी टाटा यांच्या जन्माने होते. सुरवातीचा काही काळ पुस्तक संथ राहते कारण तो काळ म्हणजे टाटा समूहाची पायाभरणीचा काळ होता. पण याच कालखंडात टाटा पावर सारखा जगात कुठेही न उभारलेला भव्य प्रकल्प उभारून भविष्याची चुणूक या समूहाने दाखवून दिली. नंतर पुढे स्काय इज द लिमिट (Sky is the limit) या उक्ती प्रमाणे ही घोडदौड अखंड चालू राहते.

टाटा समूहातील विविध उपकंपनी जसे टी. सी.एस, टाटा केमिकल्स, टेल्को, टाटा स्टील इत्यादींची सुरवात कशी झाली याची रंजक माहिती आपणास मिळते. टाटा हे नाव सुई पासून विमान या सर्व क्षेत्रात आहे हे वाचून मन थक्क होते. काही उत्पादने टाटा ची आहेत/होती हे वाचल्यावर टाटा समूहाचा विस्तार केवढा अवाढव्य आहे हे कळते. जसे दिवाळीत वापरायचा मोती साबण, रोजच्या वापरातील हमाम आणि कपड्यांचा ५०१ ही देखील टाटांची उत्पादने होती. ACC सिमेंट, नॅशनल अशुरन्स कंपनी, एअर इंडिया या देखील टाटा समूहातील कंपनी. स्वयंपाक घरातील डाळी, कडधान्ये आणि मीठ हे देखील टाटा समूहातील एका कंपनीचे. डोळे दिपवणारे तनिष्क, जग्वार आणि टायटन हे देखील टाटा समूहातील.Indian Institute of Science, Haffkin Institute, Bhabha Automatic Institute आणि टाटा मेमोरियल या जगातील अग्रगण्य संस्था देखील टाटांची देणगी आहे. यादी अजूनही मोठी आहे ती पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच.

एकंदरीत पुस्तक कुठेही बोजड अथवा कंटाळवाणे वाटत नाही. मुद्देसूद मांडणी आणि जमेल तेवढी पारदर्शकता ठेवायचा लेखकाने चांगला प्रयत्न केला आहे. ज्यांना टाटा समूहाबाबत कुतूहल आहे आणि काही प्रेरणादायी वाचायचे आहे त्यांनी हे निश्चित वाचावे.

तळटीप:सदर पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद The Tatas या नावाने प्रकाशित झाला आहे. 

 

Comments

Popular Posts