प्रेरणा : द साऊंड ऑफ सायलेन्स

 



प्रेरणा : द साऊंड ऑफ सायलेन्स 
लेखक: उज्ज्वला सहाणे 
प्रकाशक: प्रेरणा कम्युनिकेशन

वाचनवेडा च्या पुण्यातील सदिच्छा भेटीत या पुस्तकाबद्दल माहिती मिळाली. आणि तिथे पुस्तकाच्या लेखिका पण भेटल्या; तेव्हा पुस्तक घरी आणले.

पुस्तक आत्मकथा प्रकारातील आहे. पण खरंतर ही एक संघर्षकथा आहे. यात जागोजागी लेखिकेच्या कुटुंबाने अनुभवलेले समाज, जातव्यवस्था आणि प्रसंगी जवळचे नातेवाईक यांच्याविरुद्ध आलेले संघर्ष टिपले आहे. पण या संघर्षात खचून न जाता कुटुंबाने परिस्थिती ला खंबीरपणे दिलेलं आव्हान हे मनाला एक उभारी देऊन जाते. 

स्वतःच्या राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे उज्ज्वला मॅम आणि केशव सरांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत जो संघर्ष या पुस्तकात मांडला आहे तो वाचताना आतून सतत काहीतरी जाणवत राहते. प्रेरणा म्हणजे लेखिकेची मुलगी तिची जिद्द, चिकाटी आणि तिच्या आई वडिलांनी दिलेली साथ देखील वाखणण्याजोगी आहे.  प्रेरणा लहानपणी आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्याने कर्णबधिर होते  पण त्याच्यावर मात करत ती भरतनाट्यम च्या शिखरावर पोहचते हा प्रवास आणि तिची जडणघडण या पुस्तकात मांडलेली आहे. आपल्या जीवनात पण एक दुःख संपले की दुसरे दुःख आ वासून उभे राहत असते. पण अशा वेळी त्यात खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करायची उमेद हे पुस्तक वाचून मिळते. आणि कष्टाचे फळ थोडे उशिराने पण नेहमी मिळतेच या उक्तीचा प्रत्यय येतो. 

प्रस्तुत पुस्तकात जे प्रसंग आहेत ते आपल्या आजूबाजूला घडणारे आणि आपल्या पण जीवनात घडणारे असे आहेत. त्यामुळे वाचताना जणू काय आपण या गोष्टी केव्हातरी अनुभवल्या आहेत असे वाटून जाते. 

पुस्तक वाचनीय आहे तसा मी आत्मकथा थोड्या कमीच वाचतो. पण मला पुस्तक आवडले आणि तुम्हाला जर काही प्रेरणादायी वाचायचे असेल तर निश्चित वाचावे असे आहे. 

 

ता. क: पुस्तक वाचून साधारणतः एक वर्ष झाले पण मध्यंतरी पुस्तकांवर काही लिहून पोस्ट करता नाही आले. त्यामुळे जरा उशिराने केलेली पोस्ट आहे.

 


Comments

Popular Posts