तेल नावाचं वर्तमान

 

 

तेल नावाचं वर्तमान
लेखक: गिरीश कुबेर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन

या पुस्तकाबद्दल काही महिन्यांपूर्वीच कळलं होत. आणि तेव्हा ऑर्डर करून पुस्तक मागवले देखील होत. पण मधील काळात खूप भटकंती झाली त्यामुळे वाचन म्हंटले तर थोडे मागे पडलेच होत. काही आठवड्यांपूर्वी पुन्हा पुष्कळ कॉमिक्स वाचून काढल्या आणि appetizers मिळाल्यासारखे भूक वाढत गेली. वैचारिक वाचण्यापेक्षा काहीतरी वेगळे वाचू म्हणून अखेरीस हे पुस्तक निश्चित करून वाचायला घेतले.

यापूर्वीची या शृंखलेतली २-३ पुस्तके वाचून झाली होती. त्यामुळे बऱ्यापैकी पार्श्वभूमी माहिती होती. आणि पुस्तकाच्या प्रस्तावनेत याचा उल्लेख केलेलाच आहे. पण सलगता आणि विषयाचा पाया समजून घ्यायचा असेल तर पूर्वीची पुस्तके वाचणे क्रमप्राप्त आहे. पुस्तकाची विभागणी आपण ३ भागात करू शकतो. एक म्हणजे पुस्तकाची सुरवात मागील मुख्य पुस्तक ' हा तेल नावाचा इतिहास आहे ' याच्या शेवटापासून म्हणजेच सद्दाम हुसेन आणि इराण च्या पराभवापासून होते.

या नंतर युद्धाचे लोण आणि प्रगत म्हणवणाऱ्या देशांची तेलाची भूक कशी वाढत गेली आणि इराक युद्धाच्या खाईत कसे ढकलले गेले यावर लेखकाने चांगला प्रकाश टाकला आहे. याच बरोबर विसाव्या शतकातील काही दुःखद घटना जसे सिरियाची वाताहत कर्नल गडफी चा अस्त. यावर विस्तृतपणे लिखाण आहे. आणि अगदी याच काळात या घटनांच्या पडसाद म्हणून आलेल्या तेलाच्या संकटामुळे आपल्या देशात तेव्हाच्या सरकारच्या विरोधात तयार झालेले वातावरण आणि त्याच पार्श्भूमीवर निवडून आलेल्या सरकारचे तेल विषयक धोरण याची मीमांसा केलेली आहे.

दुसरा भाग म्हणजे तेलाच्या असुरी भुकेच्या उठलेल्या तवंगात उठलेली एक लहर दहशतवाद यावर आहे. यात तेल आणि नैसर्गिक वायू यावर पोसल्या जाणाऱ्या विविध दहशतवादी संघटनांची माहिती आपणास होते यातील काही कुप्रसिद्ध म्हणजेच आयसिस आणि बोको हराम यांची सुरवात या ऊर्जास्रोतात आहे हे वाचून आश्चर्य वाटते. सदर माहिती लेखकाने अतिशय सुस्पष्टपने मांडली आहे. यात लेखकाने अमेरिकेची लादेन विरोधी मोहीम आणि त्याचा अंत यावर प्रकाश टाकणारे एक प्रकरण पण लिहले आहे.

तिसरा भाग म्हणजे वाहनातील तेलाचा पर्यायी ऊर्जास्त्रोत आणि आज सर्वांना भुरळ पाडणाऱ्या बॅटरीचलित वाहनांचा मुख्य भाग म्हणजे लिथियम यावर आहे. या लिथियम मुळे उद्भवणारे भविष्यातील काही गहन प्रश्न देखील यात आले आहे.

पुस्तकाची मांडणी चांगली आहे आपण पारंपारिक ऊर्जास्त्रोतांकडून नवीन ऊर्जा स्त्रोतांकडे होणारा प्रवास चांगला आहे. यात या स्त्रोतांमुळे तयार होणाऱ्या लहरी जसे की दहशतवाद, विविध देशातील सत्ताबदल, पर्यायी ऊर्जास्त्रोतांची गरज, ते शोधण्यासाठी अमेरिकेने दाखवलेले अतुलनीय प्रयत्न, विद्युत ऊर्जास्त्रोत आणि त्याचा इतिहास ज्यात निकोलस टेस्ला चे काम आणि इलॉन मस्क ची महत्वकांक्षा हे छान टिपले आहे. काही गोष्टीची कमतरता जाणवली जशी की भारत सरकारचे इंधनाचे किंमत ठरवण्याचे नवीन धोरण. जुन्या धोरणावर मागील पुस्तकात सोदाहरण प्रकाश टाकला होता.

एकंदरीत पुस्तक हे यापूर्वी प्रकाशित झालेली लेखकाची तेल विषयक पुस्तके आणि अधर्मयुद्ध यांचे एकत्रित आणि अद्यावत माहिती असलेले पुस्तक आहे. यातील पुष्कळ प्रसंग हे गेल्या दीड दशकातील असल्याने आपण वृत्तपत्र आणि विविध समाजमाध्यमातून जवळून पाहिले आहेत. ते समजून घेण्यासाठी पुस्तक एकदा वाचण्यासारखे आहे. या विषयावर मराठी भाषेत पुस्तके अगदी नाहीच आहे असे म्हंटले तरी चुकीचं ठरणार नाही. बाकी लेखकाबद्दल सांगायचे झाले तर कुबेरांचा पत्रकारिता करताना सदर विषयाचा खूप अभ्यास झाला आहे. त्यामुळे हे पुस्तक एका चांगल्या माहितीचा स्रोत आहे. पुस्तक एका बैठकीत संपण्यासारखे नाही. जर आपण वरील विषयात रस असेल आणि यापूर्वीची पुस्तके वाचली असतील तर निश्चित वाचावे असे पुस्तक आहे.

Comments

Popular Posts