दुर्गभ्रमणगाथा

 

दुर्गभ्रमणगाथा
लेखक: गो. नी. दांडेकर
प्रकाशक: मृण्मयी प्रकाशन

गोनीदां म्हंटले की आपणांस डोळ्यासमोर येते  शितू, माची वरचा बुधा, कादंबरीमय शिवकाल, आणि जैत रे जैत. गोनीदां हे उत्तम कादंबरीकार बरोबरच एक दुर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमी देखील होते. असे म्हणत अप्पासाहेब म्हणजेच गोनिदां तळेगाव ला नसतील तर निश्चितच राजगड किंवा रायगडावर भेटतील.

दुर्गभ्रमणगाथा म्हणजे गोनीदांनी आयुष्याच्या संध्याकाळी स्मृतीच्या वृक्षाला हलकासा धक्का देऊन पाडलेला आठवणरुपी पारिजातकाचा सडा. या आठवणीत काय काय आहे ? इथे स्वराज्याची राजधानी रायगड आणि राजगड आहे, प्रचंडगड(तोरणा) पासून सिंहगड, हरीश्चंद्रगड आणि इतर दुर्ग आहे. हे गड फिरताना आलेले विविध रोमांचकारी अनुभव आहे. गोनीदांनी त्यांच्या शैलीत केलेले हे प्रवासवर्णन म्हणजे आमच्या सारख्या दुर्गवेडयासाठी मेजवानीच. 

तसे गोनीदांनी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच किल्ले पाहिलेत असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही. या पुस्तकात त्यातील काही ठराविक किल्ले पाहतानाच्या वेगवेगळ्या आठवणी शब्दांकित केल्या आहे. रायगड आणि राजगड यांना थोडे झुकते माप दिले आहे पण जे वर्णन राजगडाचे आहे ते मनाला भुरळ पाडणारे आहे. तिथे पाहिलेला इंद्रवज्र आणि ढगांची दुलई पांघरलेले डोंगर असे वाचताना पुन्हा एकदा राजगडाला भेट देऊन मुक्काम करण्याची प्रबळ इच्छा होते. त्यात गोनीदांनी ज्या व्यक्तींबरोबर ही दुर्गभ्रमंती केली त्यात कितीतरी प्रतिभावान नावे आहे
बाबासाहेब पुरंदरे, उषा मंगेशकर, महादेवशास्त्री जोशी, इंदूताई टिळक, वसंतदादा पाटील आणि अजूनकीतीतरी नावे. त्यावेळी अशा लोकांचा सहवास ज्या दुर्गप्रेमींना लाभला त्यांचे मी ते भाग्य समजतो. अशा व्यक्तीबरोबरच अप्पसाहेबांना साथ लाभली ती स्थानिक लोकांची त्यात रायगडचे तुकाराम शेडगे, गडावर वस्ती करून राहणारे धनगर, राजगडावरचे बाबूदा आणि राजमाचीचे खंडबा अशी ही तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं देखील गोनिदांनी खूप छान जपली. हेच गड भटकताना गोनिदांना माचीवरचा बुधा भेटला, जैत रे जैत चा नाग्या भेटला आणि कांदबरीमय शिवकाल देखील काहीसा या गडावरच लिहला गेला.

यातील काही प्रसंग इतके सुंदर मांडले आहे की जर तुम्ही तो गड यापूर्वी पाहिला असेल तर ते दृश्य सचित्र तुमच्या पुढे उभे राहते. मला पुस्तक वयक्तिक खूप आवडले, मी स्वतः दुर्गप्रेमी आहे त्यामुळे ते सहाजिकच आहे. पण तुम्ही दुर्गप्रेमी नसाल तर पुस्तक वाचल्यावर निश्चित यातील एखादा गड पाहण्याचा मोह तुम्ही आवरू शकत नाही. सर्व गडवेड्या वाचकांनी वाचवेच असे पुस्तक आहे हे.

Comments

Popular Posts