कोसला

कोसला


कोसला
लेखक: भालचंद्र नेमाडे


चांगदेव चतुष्टय संपवले आणि कोसलाचे वेध लागले. कोसला चा एक उतारा आम्हाला नववी/दहावी ला कुमारभारतीच्या पुस्तकात अभ्यासक्रमात होता. तेव्हा एवढी उत्सुकता नव्हती चाळवली गेली, पण चांगदेव वाचल्यावर नेमाडे यांची लेखन शैली आणि वास्तववादी लेखन फार आवडले. कोसलावर बरेच अभिप्राय वाचायला मिळाले जसे की "कोसला हा मराठी साहित्यक्षेत्रातील मैलाचा दगड आणि मराठी साहित्याचे दोन भाग पडतात कोसलापूर्व आणि कोसलानंतर."
एवढं सर्व ऐकल्यावर ही कादंबरी वाचायला घेतली पण प्रांजळपणे सांगावस वाटते की आपल्याला सांगवीकर काही झेपला नाही.

ही नेमाडे यांची प्रथम कादंबरी जसे कादंबरी वाचण्यापूर्वी ऐकले होते की ही कादंबरी वेगळीच आहे. याचा प्रत्यय कादंबरी वाचताना वेळोवेळी आला. कोसला ला पारंपरिक कादंबरीच्या साच्यात बसवता येणार नाही अस काही वाचायला मिळणार अशी अपेक्षा ठेवून वाचणार असाल तर तुमचा सपशेल अपेक्षभंग होऊ शकतो.

पांडुरंग सांगवीकर कोसलाचा नायक एका दूर खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी येतो आणि कोसलाचा प्रवास चालू होतो. मला सुरवातीला कथानक थोडेसे रटाळ वाटायला लागले पण एकदा लेखकाच्या शैलीचा अंदाज आला आणि मग तो रटाळपणा निघून गेला. सुरवातीला काही साधे प्रसंग असले विस्तृत लिहले आहे की विचारता सोय नाही "उदाहरणार्थ" पांडुरंग अभ्यास करताना उंदीर मारायचा पराक्रम करतो ते. पुढे त्याचं कॉलेज - हॉस्टेल जीवन, इंटर ला असताना संपर्क वाढावेत म्हणून केलेले प्रताप, पहिल्या वर्षी भेटलेले मित्र आणि कसाबसा संपवलेला अभ्यास.

सुरवातीचे कॉलेजमधील प्रसंग आपल्याला खिळवून ठेवतात. जसेजसे पुस्तक पुढे सरकत जाते तसे ते प्रगल्भ होत जातं. पांडुरंग च्या वागण्यातले बदल अधोरेखित होत जातात. नेमाडे यांनी पुस्तकात बऱ्याच लेखन शैली हाताळल्या आहेत. एक प्रकरण तर पूर्णपणे पांडुरंगाच्या डायरीवर आधारित आहे.

जसे वरती उल्लेख केला त्याप्रमाणे सांगवीकर आपल्याला पुस्तकाच्या अखेरीस झेपला नाही. त्याने मांजर मारण्यासाठी केलेला अट्टहास आणि मनी देवीच्या साथीत गेल्यावर केलेला शोक हा त्याची अगदी टोकाची व्यक्तिरेखा दाखवतो. गावातील विविध व्यक्तींची छोटीशी व्यक्तिचित्रे ही छान होती. पण नंतर गावी गेल्यावर पूर्णपणे काही न करता घालवलेला वेळ एकंदरीत नैराश्याने ग्रासलेला वाटला. यापेक्षा चांगदेव फारच प्रगल्भ वाटला.

तर पुस्तक हलकेफुलके बिलकुल नाही त्यामुळे तुम्ही कॉलेज लाईफवर काही वाचायला मिळेल असे काही मनात ठेवून वाचणार असाल तर पुस्तक उत्तरार्धात तुमची निराशा करेल. पण लेखनाचे निरनिराळे आणि नवीन प्रयोग पहायचे असतील तर हे पुस्तक नक्कीच वाचा.

Comments

Popular Posts