हा तेल नावाचा इतिहास आहे

हा तेल नावाचा इतिहास आहे

 




हा तेल नावाचा इतिहास आहे
लेखक - गिरीश कुबेर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन 


खरंतर हे पुस्तक वाचण्यापूर्वी या पुस्तकाबाबत मी मत बनवले होते. की हे असंच इंग्रजी साहित्यावर आधारित असणार अजून एक पुस्तक असणार. पण वाचायला सुरवात केल्यावर माझा हा समज चुकीचा निघाला.

हे पुस्तक वाचताना आपण एक माहितीपट पाहतोय असाच अनुभव येतो आणि इथेच लेखकाचं कौशल्य दिसून येतं.कुबेर यांनी अतिशय मुद्देसूद आणि विषयाचा अभ्यास करून पुस्तकाची मांडणी केली आहे. इतिहासातील प्रसंग मांडताना साधी सोपी भाषा वापरली असल्याने सर्व प्रसंग जवळून पाहिल्यासारखे वाटतात.

तेल (ऑईल) यावर आधारित हे पुस्तक आहे. नावाप्रमाणेच इतिहास आणि त्याचा आढावा. तेल सर्वप्रथम कुठे सापडले आणि त्याचा प्रवास येथून पुस्तक चालू होते. जागतिक राजकारणावर पेट्रोलियम चा केवढा पगडा आहे हे वाचल्यावर मती गुंग होऊन जाते. याउपर दोन्ही महायुद्धाची सुरवात कोठेतरी या तेलाशीच निगडित आहे. रशियाची राजक्रांती, चीनचा विस्तारवादी, अमेरिकेची अर्थव्यवस्था, एक सबंध देश तयार होणे, दोन देशात एक दशकभर लढाई, छोट्यामोठ्या देशांची प्रगती आणि आपल्या घरातील चूल या सर्वं गोष्टींच्या मुळाशी तेल आहे हे वाचून नवल वाटल्याखेरीज राहणार नाही.

यात उल्लेख केलेल्या आणि आपल्या आजूबाजूस पाहिलेल्या काही कंपनी जसे की शेल, शेवरॉन, ब्रिटिश पेट्रोलियम, इंडियन ऑइल, अर्माको यांची सुरवात कशी झाली हे वाचने फार रंजक आहे. पुस्तक २००६ साली प्रकाशित झाले असल्यानं इतिहास आणि आढावा हा त्या सालपर्यंत आहे. यामुळे वाचकांची उत्सुकता चाळवून वाचकाला अजून माहितीचा शोध घ्यायला पुस्तक संपताना भाग पाडते.

हे पुस्तक त्या सर्वासाठी आहे ज्यांना या तेल (ऑइल) या विषयाची फाफटपसार टाळून माहिती करून घ्यायची आहे. तर अशा वाचकांनी हे पुस्तक जरुर वाचावे.





Comments

Popular Posts